मुखपृष्ठ

Thursday, July 27, 2023

आॕगमेंटेंड रिॲलिटी : अनुभूती

 


आॕगमेंटेड रिॲलिटी : अनुभूती 

        परिसरात मुलं गप्पा मारतांना त्यांना नवा अनुभव द्यावा म्हणून एआर शी संबंधित ॲप्स सुरू करून मुलांमध्ये प्राणी,पक्षी,डायनासोरचे आभासी चित्र उभे केले.नंतर मुलांना एकत्र करून ती दाखवली.मुलांना नव्या कल्पनेचे अप्रुप वाटले.शिक्षणाच्या नव्या अनुभूतीचे मुलांनी स्वागत केले.

       शालेय परिसरात जंगलातले हरण,हत्ती,वाघ,उंट,मोर,पोपट पाण्यातले अनेक प्रकारचे मासे आज मुलांना भेटायला आले.मुलांनीही या आभासी जगातलं विश्व अनुभवलं.त्याच स्वागत केलं.वर्गातला टेबल,फरशी हवं तिथे मुलं हा अनुभव घेऊ लागली.आॕगमेंटेंड रिॲलिटी ही संकल्पना मुलांनी समजून घेतली.

      प्रत्येक मूल वेगळे असते म्हणजेच त्याची शिकण्याची पद्धतही वेगळीच असते.विद्यार्थ्यांना दृक,श्राव्य,गंध,चव,स्पर्श अशा विविध पद्धतीने शिकवलं जातं नव्हे तर ते शिकतेच.पुस्तकापलीकडील शिक्षण हे फार वेगळे असते.त्याची अनुभूती मुलांना होणं गरजेचं असतं.आॕगमेंटेंड रिॲलिटीने आज मुलांना नैसर्गिक आणि आभासी जगाशी जोडलं.वास्तविक जीवनाचं भान घेतांना आभासी जगातून ज्ञानाचं संवर्धन करणं,ते शिकणं वा तशी संधी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचे असते.

      मुलांना शाळेत येण्यासाठी,ते टिकविण्यासाठी नवनवे प्रयोग,उपक्रम हे शाळेत सातत्याने राबवावे लागतात.त्यास विषय,अभ्यास घटकाची जोड दिल्यास ते आनंदाने हे नवे प्रयोग स्विकारतात.शाळेत 'नया कुछ मिलता है' ची भावना त्यांच्यात निर्माण होतेच होते.आपले अध्ययन अध्यापनाचे घटक समजावून देणेही यामुळे सोपे जाते.प्रत्येक शाळा,परिसर,पालक इ.सारेच हे वेगवेगळे असते त्यामुळे प्रयोगांना वाव असावा.तंत्रज्ञानातील बदल हे स्विकारायलाच हवे पण तेही भान ठेवूनच.वेळेचे नियोजन करून असे लहान लहान अनुभव मुलांना टप्प्याटप्प्याने दिल्यास मिळणारा अपेक्षित परिणाम हा मिळतोच.

     एकंदरीत आजचा एआरलुप,ॲनिमल फोरडी,क्वीवर,फेसबुक आॕगमेंटेंड रिॲलिटी अनुभव मुलांना नवा होता.आभासी जगातल्या प्राण्यांना,पक्ष्यांना,वस्तूंना भेटून मुलांना आनंद झाला.आपण या माध्यमातून आपल्या कविता,उजळणी,पाढे,वार,महिने,बाराखडी तयार करूयात हा विचार त्यांच्या मनात आला हे महत्त्वाचे होते.एक प्रयोग दुसऱ्या प्रयोगाला जन्म देऊन गेला हे वेगळे सांगायलाच नको हं...!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.

@गिरीजादूत











Saturday, July 15, 2023

जिथे कमी तिथे आम्ही

 

जिथे कमी तिथे आम्ही

       गरीब,होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी अन् फक्त ते या साधनांच्या अभावी शाळेपासून वंचित राहू नयेत म्हणून मदतीचा व्हाटस्अपचा एक मेसेज युवा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण पाटील यांना पाठवला होता.त्यास त्याच क्षणाला प्रतिसाद मिळाला.आज प्रत्यक्षात युवा अस्तित्व फाऊंडेशनची टीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे येथे आली अन् मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून गेली.

      विद्यार्थ्यांना ड्रेस,वही,पेन,पेन्सिल,खोडरबर,रंगपेटीपासून विविध शैक्षणिक साहित्य आज मिळालेत.विद्यार्थ्यांशी हितगूज साधतांना युवा अस्तित्व टीमला आनंद झाला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना,"जीवनात अभ्यासाचं महत्त्व सांगताना चांगला माणूस बना." हा अनमोल संदेश टीमने यावेळी दिला.विद्यार्थ्यांशी सेल्फी,त्यांच्यात बसून संवाद साधणं हे खास भावलं.

     तळागाळातल्या लेकरांसाठी आज थेट नाशिकहून मालेगाव गिरणा डॕमजवळ म्हणजेच जळगाव जिल्ह्याच्या सीमेपर्यंत युवा पोहोचलेत हे विशेष.आज त्यांनी मदतीचा हात तर दिलाच पण भविष्यातील वाटचालीकरिता पुन्हा जे आपणांस विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक साहित्य लागेल त्यासाठीही आम्ही सदैव तत्पर राहू असा विश्वास देखील दिला.

         आज युवा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.किरण माणिकराव पाटील,सदस्य श्री.मिनाथ लेवे,श्री.रोहित कासार,श्री.सारंग जाधव,श्री.सचिन भामरे हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.राज्यभरातील युवांना सोबतीला घेऊन अवघ्या महाराष्ट्रात आपले कार्यक्षेत्र विस्तारणारे किरण पाटील व टीम युवा अस्तित्व फाऊंडेशन,नाशिक यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.शासनाची कोणतीही मदत नसतांना सोबतीला मिळालेले मित्र यांच्या मदतीतूनच हे सामाजिक शैक्षणिक कार्य हे फाऊंडेशन करत असतं.त्यांचा एकत्र येण्याचा प्रामाणिक हेतू हाच या फाऊंडेशनचं महत्त्व अधोरेखित करतो.

       आज युवा अस्तित्व फाऊंडेशन,नाशिक यांनी उंबरधे शाळेला दिलेली शैक्षणिक साहित्याची अनमोल भेट निश्चितच मुलांच्या भविष्यकालीन गुणवत्ताविषयक वाटचालीकरिता पथदर्शक ठरेल.मुलांना सहजच यांमुळे शिक्षणाची गोडी तर लागेलच पण दैनिक उपस्थिती ठेवण्यासाठीही ही भेट मदत करेल.गरीब लेकरांच्या चेहऱ्यावर खास हसू होतं फक्त अन् फक्त युवा अस्तित्वच्या टीमच्या आजच्या शैक्षणिक साहित्य भेटीमुळे अन् त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादामुळेच..!

       युवा अस्तित्व फाऊंडेशन नाशिक,महाराष्ट्र यांचे ब्रीद 'जिथे कमी तिथे आम्ही' हे खरोखरच कतृत्वाला साजेसे आहे.त्यांचे आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे ता.मालेगाव जि.नाशिक येथील सर्व विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व युवा ऋणी राहू..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.

- गिरिजादूत
















शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...