मुखपृष्ठ

Wednesday, August 23, 2023

गोष्ट वाचन : आव्हान



गोष्ट वाचन : आव्हान

      'वाचकांची शाळा' हा उपक्रम हाती घेतल्यानंतर शाळेत उपलब्ध असलेली ग्रंथालयातील पुस्तके सहज उपलब्ध होत असतात.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी छोटे छोटे वाचन गोडी वाढवणारे प्रयोग सध्या शाळेत सुरू आहेत.

         मुलांना 'नवे ते हवे असते' म्हणूनच 'वाचकांची शाळा' या उपक्रमासाठी मुलांना नवनवे पुस्तके शाळेत उपलब्ध व्हावीत यासाठी सोशल मिडियातून आवाहन केल्यानंतर कल्याण येथील उज्वल थोरे यांनी उंबरधे शाळेतील मुलांसाठी मराठी,इंग्रजी व हिंदीतील गोष्टींची 13 पुस्तकांची भेट दिली.हे ऊर्जादायी आहे आमच्यासाठी.

        दुपारच्या सुट्टीनंतर वाचकांची शाळा भरली.आपल्या आवडीची पुस्तके अन् आज मुलांच्या हाती नवीन पुस्तक आल्याने मुलांमध्ये नव्याचे आकर्षण होते.प्रकट वाचन अन् मौन वाचनाचं महत्त्व सांगण्यात आल्याने मुलं आपल्या आवडीने पुस्तक वाचू लागलेत.सहजच पूर्ण गोष्टींचं पुस्तक वाचण्याचं आव्हान त्यांना देण्यात आलं.

         आव्हान दिल्याने पटकन मुलांनी आपापल्या वाचनाच्या जागा घेतल्या.आव्हान स्विकारण्याची क्षमता अन् ती पूर्ण करण्यासाठी तयार करावी लागणारी सकारात्मक ऊर्जा सतत मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी असे लहान लहान प्रयोग खूप महत्त्वाचे असतात.

          मुलांना वाचनाचं आव्हान दिल्यानंतर मुलांनी आपल्या क्षमतेनुसार गोष्टी वाचल्यात.काहींनी पुस्तकातील चित्रांची सैर केली.एकमेकांत संवाद घडला.यात सृष्टीने आपले आव्हान पूर्ण करतांना हाती आलेले 'रंगतदार गोष्टी' हे पुस्तक पूर्ण वाचून काढले.वाचलेल्या गोष्टीतला मजकूर सहज आपल्या भाषेत सांगितला.समजपूर्वक वाचनही झालं होतं.तिचं कौतुक व्हावं म्हणून  मुख्याध्यापक शांताराम मोरे सर यांनी बक्षीस म्हणून 'स्मार्ट हॕन्ड रायटिंग' नोटबुक तिला भेट दिली.शाबासकी दिली.मुलांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.'सेल्फी विथ सक्सेस' मिळाली.

            मुलांना गोष्टी ऐकायला,पहायला अन् वाचायला आवडतात.आज मुलांमध्ये नवा आत्मविश्वास आज निर्माण झाला होता.मुलांमध्ये आज अंतःप्रेरणा निर्माण झाली होती.स्वतः शिकण्याची प्रवृत्ती अन् आतून ऐकणं काय असतं हे त्यांना समजलं होतं.मुलं ही सतत आव्हानं स्विकारण्यासाठी तयार असतात त्यांना त्यांच्या क्षमतेचं आव्हान दिल्यानंतर ते स्वतः त्यात सहभागी होऊन शिकत असतात.पाठ्यपुस्तकांच्या पलिकडचं शिक्षण त्यांना वेळोवेळी हवं असतं,ते त्यांना उपलब्ध करणं आपलं काम.आज उज्वल थोरे दादा यांची पुस्तकरुपी भेट मुलांमध्ये आव्हान स्विकारण्याची 'स्व जाणीव' निर्माण करून गेली.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

@गिरीजादूत

9665911657






Friday, August 18, 2023

वाचकांची शाळा

 वाचकांची शाळा

     वाचकांची शाळा? वाचतांना थोडं वेगळं वाटेलच.पुस्तकांचं गाव,आमचे ग्रंथालय,आमची पुस्तके,पुस्तकांचं हॉटेल असलं काही वाचनात आलं असेलही परंतू 'वाचकांची शाळा' निर्माण करणं ही आमची गरज वाटली अन् आमच्या उंबरधे शाळेचे मुख्याध्यापक श्री.शांताराम मोरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,त्यांना सहज अन् सदैव वाचनास पुस्तकं उपलब्ध व्हावी यासाठी उपयुक्त ठरतील असे बालसाहित्याची चित्रमय, गाणी,गोष्टी,ॲक्टिव्हिटीज्,डिक्शनरी,जनरल,नॉलेज,व्याकरण इ.विविध उपयुक्त अडीच हजारांची पुस्तके मुलांसाठी विकत घेत हा नवा उपक्रम हाती घेतलाय.

       'वाचकांची शाळा' मुलांना सहज आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणार आहे.मुलांना सहज पुस्तके वाचायला मिळणार आहेत.वैयक्तिक तसेच सामुहिक वाचन या निमित्ताने घडणार आहे.उपलब्ध असलेली अन् नसलेली पुस्तके पुन्हा नव्याने मुलांच्या हातात पडणार आहेत.मुलं वाचती झाली म्हणजे अध्ययन अध्यापन करणे सोपे जाणार आहे.वाचनाचं महत्त्व या निमित्तानं मुलांना समजणार आहे.

      काल हा नवा उपक्रम हाती घेतल्याने हाती आलेल्या पुस्तकांतून मुलांना खूप आनंद झालाय.'हर रोज नया कुछ मिलता है' ची सकारात्मक भावना त्यांच्यात निर्माण झालीय.पाठ्यक्रम व्यतिरिक्त दुसरी पुस्तके जी कधी पाहिलीही नाहीत,असंही असतं...हे पुस्तकातलं जगणं त्यांनी अनुभवावं यासाठी 'वाचकांची शाळा' हा उपक्रम मुलांमध्ये नवी वाचनाची ऊर्जा निर्माण करणार आहे.

        वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांना कायम स्वरुपी वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध व्हावी,वाचक घडावा ही प्रामाणिक भावनाच प्रेरक आहे."पुस्तकांचं जग" अनुभवण्यासाठी "वाचकांची शाळा" निश्चितच दिशादायी ठरणार आहे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

@गिरीजादूत

9665911657

(टीप - 'वाचकांची शाळा' या उपक्रमास बळ देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली जुनी नवी पुस्तके आपणही आमच्या मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून देऊ शकता.आपले योगदान बहुमोल असेल.)












Wednesday, August 16, 2023

Thursday, August 3, 2023

निसर्गाचं देणं

 


देणं निसर्गाचं

       दोन दिवसांपूर्वी तयार केलेल्या 'सीड बॉल्स' सोबतीला असतांना नि परिसरात मिळालेल्या वडाच्या फांद्या,पिंपळ,निंब,गुलमोहर,सीताफळ यांची रोपं घेऊन उंबरधे परिसरातील बिरोबा महाराज टेकडीवर उंबरधे शाळेच्या विद्यार्थी शिक्षकांनी निसर्गाचं देणं फेडण्याचा प्रयत्न केलाय.

      "निसर्ग आपल्याला भरभरून देतो मग आपण त्याचं संवर्धन करावं.आपल्याला शक्य असेल ते करत रहावं म्हणूनच आपण आज या टेकडीवर लावलेल्या बीया,लावलेली झाडं यांची निगा आपण राखूयात आणि निसर्गाचं हे देणं जपूयात" असे आवाहन मुख्याध्यापक श्री.शांताराम मोरे यांनी यावेळी केले.

       सकाळीच वनभोजनाची नैसर्गिक सहलीसाठी मुलांची लगबग सुरू झाली.आपला डबा,पाणी बॉटल,बॕग पाठीला घेऊन मुलांनी "झाडे लावा,झाडे जगवा.पाणी अडवा,पाणी जिरवा.आमची शाळा हिरवी शाळा.अशा घोषणा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.गाणे,गप्पा गोष्टी,खेळ,नृत्य,बी लागवड,वृक्ष लागवड,वन भोजन इ.विविध उपक्रमांचा आस्वाद मुलांनी घेतला.

        या नैसर्गिक सहलीत आपलंही योगदान असावं म्हणून निसर्ग प्रेमी माजी विद्यार्थी यांनीही आपले योगदान दिले.या सहलीसाठी जेष्ठ शिक्षिका संगीता पवार मॕडम,देवेंद्र वायडे सर यांनी प्रयत्न केले.

      आमच्यासाठी "अजय" हा हिरो होता.त्याचं 'बियांच बोलणं' झालं नसतं तर सीड बॉल अन् आजची नैसर्गिक सहल झालीच नसती.उपक्रम झालाही असता पण त्याला निराळे स्वरूप झाले असते.एकात एक गुंफलेली ही माळ महत्त्वाची होती.मुलांमध्ये "सर,माझं ऐकतात" ही भावना निर्माण व्हायला हवी.आपल्या विषयीचा विश्वास निर्माण झाल्यास ती आनंदाने व्यक्त होतात अन् ती व्यक्त व्हायला लागली की सहजच शिक्षणाच्या प्रहावात त्यांना आणणं सोपं होऊन जातं.परिसरातील शिक्षण परिसरातून दिले गेल्यास ते प्रभावी होतं.हा अनुभव पुन्हा कामी आला.

        आजचं "निसर्गाचं देणं" खास होतं.विद्यार्थ्यांना मिळालेला हा आनंद निश्चितच ऊर्जादायी असणार आहे.

प्रेरक आहात.

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.

@गिरीजादूत



Wednesday, August 2, 2023

सीड बॉल कार्यशाळा

 

सीड बॉल कार्यशाळा

"ओ सर,आठे गुलमोहरन्या बिया पडेल सत." अजय आपले केस उडवत बोलला.

बियांकडे पाहत सहजच सीड बॉलची संकल्पना मनात डोकावून गेली.दोस्त देवेंद्रशी सीड बॉलविषयी बोलल्यावर  सहजच प्रवास सुरू झाला परिसरातील बिया जमा करण्याचा.शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व मुलांनी गुलमोहर,निंब,सीताफळसह हजारो बिया जमवून घेतल्या.

         संगीता पवार मॕडमांनी पुढाकार घेत माती आणि खताची व्यवस्था केली.देवेंद्र वायडे सरांनी माती खत एकत्र करत मुलांना चिखल करून दिला.मुख्याध्यापक शांताराम मोरे यांनी सीड बॉल तयार करण्याचे फायदे व ते कसे तयार करावेत याविषयी मार्गदर्शन केले.

           सुरु झाला प्रवास सीड बॉल तयार करण्याचा.मुलांनी गोल करून बसून घेतलं नि आपापली कामं वाटून घेत मातीचे सीड बॉल बनवण्याचा प्रत्यक्ष आनंद लुटला.त्यांच्यात होणारा सहज संवाद भारी होता.


"मन्ही,माटी दे ना यं".

"बी टाक ये तेनमा".

"सर,हाऊ बिया देत नाही मला."

"गारा दे रे आमला.."

"सर,येनी मन्हा कपडा भराई दिनात."


असे एक ना अनेक संवाद मुलांमध्ये अनौपचारिकरित्या घडू लागले होते.

        सीड बॉल तयार झाल्यावर एका खोलीत ते ठेवण्यात आलेत.वनभोजन सहल निघतेय आता उद्या.सारे बनवलेले सीडा बाॕल बिरोबा महाराज टेकडी व कुशाबा च्या परिसरात या लावल्या जाणार आहेत.

        मुलांचा हा लहानसा वन संवर्धनासाठीचा प्रत्यक्ष प्रयोग हजारो बियांचे रुजवण करून जाणार आहे.परिसरात असलेली निंब,गुलमोहर,पिंपळ,सीताफळ,बाभूळाची रोपही यानिमित्ताने लावली जाणार आहेत.मुलांचं हे परिसरातलं,मातीतलं शिक्षण खास होतं.

प्रेरक आहात...! 

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!












शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...