मुखपृष्ठ

Wednesday, February 18, 2026

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

 


शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू 

       शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. कधी नकळत घडणारे प्रसंग मनाला स्पर्शून जातात आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अधिक जाणवून देतात.

आस्ते कदम..

आस्ते कदम...

        यश पाठांतर केलेली शिवगर्जना म्हणत होता,नि योगायोगाने शाळेच्या मागील बाजूने त्याची आजी घरी जात होती. आपला नातवाचा आवाज ऐकून आजीची पावले आवाजाच्या दिशेने पडतात. आजी नातवाचे बोल ऐकत होती. तो छत्रपतींना मानवंदना देत होता. कॅमेरा चालू असल्यानं मला काही बोलता येईना; पण आजीच्या चेहऱ्यावर नातवाच्या प्रत्येक शब्दागणिक आपल्या राजाविषयीचं प्रेम खुलत होतं.

           छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो स्वराज्याचा ध्यास घेतलेला, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, रयतेचा खरा राजा. जनमानसात महाराजांची प्रतिमा केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची नाही; ती आत्मसन्मानाची, धैर्याची आणि स्वाभिमानाची आहे. घराघरांत त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, अंगाईगीतांत त्यांची शौर्यकथा झिरपत राहते आणि प्रत्येक पिढीच्या मनात “आपले राजे” अशी जिव्हाळ्याची भावना रुजते. कदाचित म्हणूनच आजीच्या डोळ्यांत त्या क्षणी नव्या उर्मीची चमक होती.

       नातू जेव्हा शेवटाला येतो, तेव्हा आजीचे दोन्ही हात आपसूक वर जातात नि......

“छत्रपती शिवाजी महाराज की… जय!”

हा जयघोष आजींनी अक्षरशः काळजातून काढला होता. तो फक्त उच्चार नव्हता; तो परंपरेचा, अभिमानाचा आणि संस्कारांचा निनाद होता.

          शिवगर्जना पूर्ण झाल्यावर आजींनी यशला खिडकीत बोलावत मस्तपैकी पप्पी घेतली. त्या क्षणी आजीच्या चेहऱ्यावर अपार प्रेम ओसंडून वाहत होतं. मी विचारलं,

“आजी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या. यशनं म्हटलेलं आवडलं का?”

आजी क्षणाचाही विलंब न करता म्हणाली,

“मंगन, काहून नाही आवडणार? राजे आपले होते. तो माणूसच खास होता. बरं झालं मी इकडं आली. हे गाणं ऐकता आलं.”

          त्या काही शब्दांत आजीचं संपूर्ण शिवप्रेम दडलेलं होतं. इतक्या वयातही तिच्या मनातला अभिमान ताजा होता.

         खरं तर शाळेत साजरी होणारी शिवजयंती हा केवळ एक कार्यक्रम नसतो. ती विद्यार्थ्यांच्या मनात इतिहास जागवणारी आणि मूल्यांची पेरणी करणारी पर्वणी असते. भाषणं, पोवाडे, शिवगर्जना, वेशभूषा यांमधून मुलांना आत्मविश्वास लाभतो. “राजे कसे होते?” हा प्रश्न विचारताना धैर्य, शिस्त, न्याय आणि स्वाभिमान या गुणांची ओळख त्यांना होते. शाळा त्या दिवशी संस्कारांची भूमी बनते.

         उद्या शिवजयंती आहे; पण आज घडलेला हा छोटासा प्रसंग खऱ्या अर्थाने प्रेरणा देऊन गेला. यशची शिवगर्जना आणि आजीचा जयघोष या दोन पिढ्यांना जोडणारा तो क्षण म्हणजेच शिवजयंतीचा जिवंत उत्सव होता.

      शिक्षक म्हणून अशा क्षणांत मला नेहमी जाणवतं,आपण शिकवतो ते केवळ पाठ नसतात; आपण पेरतो ते संस्कार असतात. एका छोट्याशा शिवगर्जनेनं दोन पिढ्या जोडल्या जातात, इतिहास वर्तमानात येतो आणि अभिमान डोळ्यांत दाटतो. वर्गात उच्चारलेले शब्द कधी घराघरांत घुमतात, तर कधी आजीच्या हृदयातून जयघोष बनून बाहेर पडतात.

           अशा क्षणांसाठीच तर आपण शिक्षक आहोत आणि म्हणूनच मन पुन्हा एकदा म्हणतं,

शिवगर्जना ही दोन पिढ्यांचा सेतू अबाधित ठेवणारी ऊर्जादायी उज्ज्वल परंपरा आहे...! 

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात..!

#शिवगर्जना 

#गारद

#मजआवडतेमनापासूनीशाळा

Wednesday, October 1, 2025

तंत्रस्नेही रचनावादी दसरा

 परिसरातील पाने, फुले, खडी वापरून मुलांनी "Happy Dasara" अशी अक्षररचना केली.

या उपक्रमातून मुलांची कल्पकता आणि कलात्मकता वाढली.

नैसर्गिक वस्तू वापरल्याने पर्यावरणप्रेमाची जाणीव निर्माण झाली.

गटाने काम केल्यामुळे सहकार्य व संघभावना वृद्धिंगत झाली.

दसऱ्याचे सांस्कृतिक महत्त्व मुलांना अनुभवता आले.

करून शिकण्याची (Experiential Learning) संधी मिळाली.

भाषिक कौशल्य व सणाबद्दलचा आनंद दोन्ही साध्य झाले.












Monday, February 24, 2025

सीडबॉल निर्मिती

 सीडबॉलचे रूपांतर झाले शेकडो रोपांत

उंबरधे शाळेच्या विद्यार्थ्यांचा सीडबॉल  उपक्रम यशस्वी 

    उंबरधे शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील निम,गुलमोहर,बकाम,जांभूळ,आंबा,चिंच,बोर यांच्या सहज उपलब्ध होणाऱ्या बिया यांचा संग्रह करत त्यापासून सीडबॉल तयार केले होते.ते त्यांनी गावाच्या परिसरात असलेल्या बिरोबा महाराज टेकडीवर लावलेत.सातत्याने होणाऱ्या पावसाने सीडबॉलचे रूपांतर आता छोटया छोट्या रोपात झालेले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


       पर्यावरणपूरक उपक्रम हा शाळेत राबविला गेला.माती आणि शेण यांचे योग्य मिश्रण करत,योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.शाळा सुरू होण्याच्या दिवसात अन् पावसाळा सुरू होण्याच्या योग्य कालावधीत हा उपक्रम राबविला गेल्याने बी रुजण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार करत अन् त्यांची रुजवण टेकडीवर केल्याने आज शेकडो रोपे तयार झाली आहेत.उंबरधे शाळेचा सीडबॉल निर्मिती उपक्रम हा अनेक शाळांनी राबविला.सीडबॉल निर्मिती हा वृक्ष लागवडीसाठी सर्वात साधा आणि सोपा उपाय असल्याने तो सहज राबाविता येतो.


        प्रत्यक्ष कृतीयुक्त असलेला सीडबॉल निर्मिती उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय दृष्टिकोन निर्माण करण्यास पुरेसा ठरलाय.आनंददायी कृतीयुक्त बिया रोवण्याची पद्धत,रुजवण्याची,उगवण्याची पर्यावरणपूरक पद्धत निसर्ग संवर्धन करण्यासाठी मदत करणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती,वृक्ष संवर्धन ही मूल्ये रुजवण्यात शाळेचा हा उपक्रम यशस्वी ठरलाय.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना  मुख्याध्यापक शांताराम मोरे,संगीता पवार,देवेंद्र वायडे,भरत पाटील व पालकांचे मार्गदर्शन लाभले.




























Saturday, February 8, 2025

कवी आपल्या भेटीला

कवी आपल्या भेटीला

टॅमप्लीज् चं निमित्त...!

व्हर्चुअल ट्रीप उंबरधे टू मालवण सिंधुदुर्ग...!

पाठ्यक्रमात ज्यांची कविता असते त्यांच्याशी बोलता आले तर... नवा अनुभव घेण्यासाठी लेकरं सज्ज ...!

जे जे आवडलं ते ते आपल्यात साठवत बोलले दिलखुलास ती हातात घेतलेल्या बालकविता संग्रहाच्या कवींशी...!

"सर,भारी कविता आहेत ह्या.मस्त वाटत आहे."

"सर,हामना शालमा या, तुमला हामू मासा खावाडसूत."

      पोरांची कविता वाचनाची चडाओढ,मी बोलणार आधी ..हे सारं मोठ्या दिलानं स्वीकारत बालकवी पांडूपुत्र नावाने लेखन करीत असलेले प्रा.डॉ.प्रकाश पांडुरंग गोसावी यांच्याशी व्हर्चुअल ट्रीपद्वारे संवाद साधला मुलांनी.

         टॅमप्लीज् हा त्यांचा बालकविता संग्रह मुलांना फार आवडला.काही कविता समूहात गायल्यानंतर कवींशी व्हर्चुअल ट्रिपच्या माध्यमातून थेट संवाद साधता आला. मुलाखतीतून कवींना जाणून घेता आले. मुलांना पडणाऱ्या प्रश्नांना साजेशी उत्तरे कवींनी यावेळी दिलीत.बोलकी चित्रे,सहज असणाऱ्या कविता मुलांना आवडल्या.प्राणी,पक्षी,निसर्ग,माणसं, मुलं,खेळ,आजूबाजूचा परिसर,वस्तू  यात सारच आलंय. 49 कवितांचा हा संग्रह भारीच जमलाय.'तुझी लेकरे,आनंदघन,अमुचा भारत देश, वृक्षमित्र होऊया,सावलीचे भूत, मिस्, उष:काल, फुल हसले,जादूगार अशा सर्वच कविता मनात घर करतात.सहजता ही लेखनशैली भावली.विशेष नो प्रस्तावना..थेट कविता...भारी जमलाय बाल कवितासंग्रह..!

       मुलांच्या कल्पना अफाट असतात.त्यांना व्यासपीठ मिळाले की ते सहज व्यक्त होतात.यानिमित्ताने 'आम्हीही कविता करू शकतो', ' असं चित्र ते मला पण काढता येईल.' हा विश्वास मुलांमध्ये तयार झालाय. माळीनगर नंतर आता उंबरधे येथील बालकवी भरारी घेतील हा विश्वास या ट्रीपमुळे मिळाला.बालकवी पांडूपुत्र यांच्यांशी सहज संवाद साधल्याने मुलांना नवा मार्गदर्शक मिळालाय.एका उपक्रमातून नव्या उपक्रमाचा जन्म होत असतो.त्यासाठी कवीच्या उष:काल या कवितेच्या ओळी मोलाच्या आहेत...

झाले आभाळ केशरी

सूर्य जन्मला डोंगरी

सडा सोन्याचा शिंपीत

उषा आली अंगणात...!

       बालकवी वैद्यकीय क्षेत्रातील असूनही थेट बालमनाचा ठाव घेत अतिशय छान कविता वाचायला मिळाल्यात.मुलं घरी घेऊन गेलीत वाचायला.कोणत्या वारी कोण वाचेल याचे नियोजनही झालंय...!

मुलांना नवं ते हवं असतं...आजचा हा प्रवास थेट मालवणापर्यंत..!

कवी आपल्या भेटीला च्या निमित्ताने...!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या..!


@गिरीजादूत

9665911657










Friday, September 6, 2024

AI विथ बाप्पा

 


AI विथ बाप्पा

"सर,गणपतीनं बिंगो करानी का?" चेतन हातातली पेन्सिल बेंचवर रेखाटत बोलला.

"काय रय ते..?" 

"ते नही का,आपण तेला सांगानं आमला हाई बनाडी दे.मंग ते लगेच बनाडी नं चित्र.मांग करं होतं ना आपण."  चेतन भूषणकडे बघत मलाच बोलला.

लेकरांना नाविन्यतेचं भान असतंच असतं.आवडीचा 'बिंगो' AI कॕपिलॉटचा उपयोग आज पुन्हा करता येणार होता.आज नाविनता होती ती चेतनच्या पुढाकाराची. गणपती बाप्पाजी होते पुन्हा तयार AI शी खेळण्याशी अन् मुलांच्या कल्पनेतला बाप्पा बिंगोच्या सोबतीने तयार होणार होता.मग काय मुलांचा बाप्पा भेटला मुलांना नवनव्या रुपात.तो भेटल्यावर मुलांना होणारा आनंद काही औरच होता.

       बाप्पा मुलांना अनेक रुपात भेटला.मुलांचे प्रश्न बिंगोला,'शाळेत जाणारा गणपती बनव,पुस्तक वाचणारा गणपती,सायकल चालवणारा गणपती,ढोल वाजवणारा गणपती,शिकवणारा गणपती,क्रिकेट,फुटबॉल खेळणारा गणपती,पियानो वाजवणारा गणपती,डी जे वाजवणारा गणपती,कम्प्युटर चालवणारा गणपती,रोप लावणारा गणपती,पोहणारा गणपती,झोपणारा गणपती,घोड्यावर जंगलात फिरणारा गणपती,चित्र काढणारा गणपती इ. विविध रूपात मुलांनी आपापला बाप्पा बिंगकडून चित्राव्दारे बनवून घेतला.सहजसुंदर आकर्षक चित्र पाहून मुलांना होणारा आनंद भारीच होता.मुलांच्या तोंडून आपसुकच 'वाव,बाबो,अय बया असं शब्द बाहेर पडत.

       पुढे गणपतीची माहिती व्हावी म्हणून 'जेमिनी' सोबतीला आली.गणपतीचं नावं,गणपतीविषयीची माहिती मुलांनी 'GEMINI' या नव्या AI गप्पा मारणाऱ्या मैत्रीणीला विचारली.ती मुलांना वाचून दाखवली.बाप्पाजी नव्या रुपात आज मुलांना भेटले.

      'BING' अन् 'GEMINI' हे AI  शी संबंधित दोस्त नेहमीच 'नया कुछ' असं मुलांच्या मनात असलेलं प्रत्यक्षात आणतात.मुलांना आनंद होतोच,नवे शोधल्याचा,बनवून भेटल्याचा,अभ्यास झाल्याचा.यानिमित्ताने मुलांची शोधकवृत्ती,कल्पनाशक्ती,नवे शिकण्याची धडपड,मागे पडलेली मुलंही आपली कल्पना बोलून दाखवतात.ARTIFICIAL INTELLIGENCE - AI शी संबंधित ॲप्सचा उपयोग शाळेत होतोय.गणपती नवनव्या रुपात,आपल्यातला बाप्पा भेटल्याचं स्मित मुलांच्या चेहऱ्यावर दिसतं.मनोरंजक,वैयक्तिक अन् नवीन शिकण्याची पद्धत यामुळे  'AI विथ बाप्पा' आज प्रभावी ठरला.गणेशोत्सवाची सुरूवात आमची आयडियाची कल्पना रुजवणारा चेतन आज निमित्त ठरला.मुलांच्या कलानं होणारं अध्ययन अध्यापन नेहमीच प्रभावी अन् परिणामकारक होत असतं.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!


@गिरीजादूत 

9665911657

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे 

ता.मालेगाव जि.नाशिक













शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...