मुखपृष्ठ

Wednesday, February 18, 2026

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

 


शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू 

       शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. कधी नकळत घडणारे प्रसंग मनाला स्पर्शून जातात आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अधिक जाणवून देतात.

आस्ते कदम..

आस्ते कदम...

        यश पाठांतर केलेली शिवगर्जना म्हणत होता,नि योगायोगाने शाळेच्या मागील बाजूने त्याची आजी घरी जात होती. आपला नातवाचा आवाज ऐकून आजीची पावले आवाजाच्या दिशेने पडतात. आजी नातवाचे बोल ऐकत होती. तो छत्रपतींना मानवंदना देत होता. कॅमेरा चालू असल्यानं मला काही बोलता येईना; पण आजीच्या चेहऱ्यावर नातवाच्या प्रत्येक शब्दागणिक आपल्या राजाविषयीचं प्रेम खुलत होतं.

           छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो स्वराज्याचा ध्यास घेतलेला, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, रयतेचा खरा राजा. जनमानसात महाराजांची प्रतिमा केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची नाही; ती आत्मसन्मानाची, धैर्याची आणि स्वाभिमानाची आहे. घराघरांत त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, अंगाईगीतांत त्यांची शौर्यकथा झिरपत राहते आणि प्रत्येक पिढीच्या मनात “आपले राजे” अशी जिव्हाळ्याची भावना रुजते. कदाचित म्हणूनच आजीच्या डोळ्यांत त्या क्षणी नव्या उर्मीची चमक होती.

       नातू जेव्हा शेवटाला येतो, तेव्हा आजीचे दोन्ही हात आपसूक वर जातात नि......

“छत्रपती शिवाजी महाराज की… जय!”

हा जयघोष आजींनी अक्षरशः काळजातून काढला होता. तो फक्त उच्चार नव्हता; तो परंपरेचा, अभिमानाचा आणि संस्कारांचा निनाद होता.

          शिवगर्जना पूर्ण झाल्यावर आजींनी यशला खिडकीत बोलावत मस्तपैकी पप्पी घेतली. त्या क्षणी आजीच्या चेहऱ्यावर अपार प्रेम ओसंडून वाहत होतं. मी विचारलं,

“आजी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या. यशनं म्हटलेलं आवडलं का?”

आजी क्षणाचाही विलंब न करता म्हणाली,

“मंगन, काहून नाही आवडणार? राजे आपले होते. तो माणूसच खास होता. बरं झालं मी इकडं आली. हे गाणं ऐकता आलं.”

          त्या काही शब्दांत आजीचं संपूर्ण शिवप्रेम दडलेलं होतं. इतक्या वयातही तिच्या मनातला अभिमान ताजा होता.

         खरं तर शाळेत साजरी होणारी शिवजयंती हा केवळ एक कार्यक्रम नसतो. ती विद्यार्थ्यांच्या मनात इतिहास जागवणारी आणि मूल्यांची पेरणी करणारी पर्वणी असते. भाषणं, पोवाडे, शिवगर्जना, वेशभूषा यांमधून मुलांना आत्मविश्वास लाभतो. “राजे कसे होते?” हा प्रश्न विचारताना धैर्य, शिस्त, न्याय आणि स्वाभिमान या गुणांची ओळख त्यांना होते. शाळा त्या दिवशी संस्कारांची भूमी बनते.

         उद्या शिवजयंती आहे; पण आज घडलेला हा छोटासा प्रसंग खऱ्या अर्थाने प्रेरणा देऊन गेला. यशची शिवगर्जना आणि आजीचा जयघोष या दोन पिढ्यांना जोडणारा तो क्षण म्हणजेच शिवजयंतीचा जिवंत उत्सव होता.

      शिक्षक म्हणून अशा क्षणांत मला नेहमी जाणवतं,आपण शिकवतो ते केवळ पाठ नसतात; आपण पेरतो ते संस्कार असतात. एका छोट्याशा शिवगर्जनेनं दोन पिढ्या जोडल्या जातात, इतिहास वर्तमानात येतो आणि अभिमान डोळ्यांत दाटतो. वर्गात उच्चारलेले शब्द कधी घराघरांत घुमतात, तर कधी आजीच्या हृदयातून जयघोष बनून बाहेर पडतात.

           अशा क्षणांसाठीच तर आपण शिक्षक आहोत आणि म्हणूनच मन पुन्हा एकदा म्हणतं,

शिवगर्जना ही दोन पिढ्यांचा सेतू अबाधित ठेवणारी ऊर्जादायी उज्ज्वल परंपरा आहे...! 

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात..!

#शिवगर्जना 

#गारद

#मजआवडतेमनापासूनीशाळा

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...