गोष्ट वाचन : आव्हान
'वाचकांची शाळा' हा उपक्रम हाती घेतल्यानंतर शाळेत उपलब्ध असलेली ग्रंथालयातील पुस्तके सहज उपलब्ध होत असतात.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी छोटे छोटे वाचन गोडी वाढवणारे प्रयोग सध्या शाळेत सुरू आहेत.
मुलांना 'नवे ते हवे असते' म्हणूनच 'वाचकांची शाळा' या उपक्रमासाठी मुलांना नवनवे पुस्तके शाळेत उपलब्ध व्हावीत यासाठी सोशल मिडियातून आवाहन केल्यानंतर कल्याण येथील उज्वल थोरे यांनी उंबरधे शाळेतील मुलांसाठी मराठी,इंग्रजी व हिंदीतील गोष्टींची 13 पुस्तकांची भेट दिली.हे ऊर्जादायी आहे आमच्यासाठी.
दुपारच्या सुट्टीनंतर वाचकांची शाळा भरली.आपल्या आवडीची पुस्तके अन् आज मुलांच्या हाती नवीन पुस्तक आल्याने मुलांमध्ये नव्याचे आकर्षण होते.प्रकट वाचन अन् मौन वाचनाचं महत्त्व सांगण्यात आल्याने मुलं आपल्या आवडीने पुस्तक वाचू लागलेत.सहजच पूर्ण गोष्टींचं पुस्तक वाचण्याचं आव्हान त्यांना देण्यात आलं.
आव्हान दिल्याने पटकन मुलांनी आपापल्या वाचनाच्या जागा घेतल्या.आव्हान स्विकारण्याची क्षमता अन् ती पूर्ण करण्यासाठी तयार करावी लागणारी सकारात्मक ऊर्जा सतत मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी असे लहान लहान प्रयोग खूप महत्त्वाचे असतात.
मुलांना वाचनाचं आव्हान दिल्यानंतर मुलांनी आपल्या क्षमतेनुसार गोष्टी वाचल्यात.काहींनी पुस्तकातील चित्रांची सैर केली.एकमेकांत संवाद घडला.यात सृष्टीने आपले आव्हान पूर्ण करतांना हाती आलेले 'रंगतदार गोष्टी' हे पुस्तक पूर्ण वाचून काढले.वाचलेल्या गोष्टीतला मजकूर सहज आपल्या भाषेत सांगितला.समजपूर्वक वाचनही झालं होतं.तिचं कौतुक व्हावं म्हणून मुख्याध्यापक शांताराम मोरे सर यांनी बक्षीस म्हणून 'स्मार्ट हॕन्ड रायटिंग' नोटबुक तिला भेट दिली.शाबासकी दिली.मुलांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.'सेल्फी विथ सक्सेस' मिळाली.
मुलांना गोष्टी ऐकायला,पहायला अन् वाचायला आवडतात.आज मुलांमध्ये नवा आत्मविश्वास आज निर्माण झाला होता.मुलांमध्ये आज अंतःप्रेरणा निर्माण झाली होती.स्वतः शिकण्याची प्रवृत्ती अन् आतून ऐकणं काय असतं हे त्यांना समजलं होतं.मुलं ही सतत आव्हानं स्विकारण्यासाठी तयार असतात त्यांना त्यांच्या क्षमतेचं आव्हान दिल्यानंतर ते स्वतः त्यात सहभागी होऊन शिकत असतात.पाठ्यपुस्तकांच्या पलिकडचं शिक्षण त्यांना वेळोवेळी हवं असतं,ते त्यांना उपलब्ध करणं आपलं काम.आज उज्वल थोरे दादा यांची पुस्तकरुपी भेट मुलांमध्ये आव्हान स्विकारण्याची 'स्व जाणीव' निर्माण करून गेली.
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
9665911657





No comments:
Post a Comment