आपल्यातला अर्जून
"सर,मै बी येऊ का पोऱ्यासले बलावाले"
आपला एक हात डोक्याला बांधलेल्या रुमालाला लावत धाडसानं बोलणारं लेकरू ते अर्जून आहे हे त्याच्याशी बोलल्यावर कळालं.
शनिवार दप्तरमुक्त असला म्हणजे झुंबा होणारच.शनिवारची सकाळ म्हणजे पालक विद्यार्थी गृहभेट ठरलेली.अर्जून नेहमीच सोबतीला असतो.नवनवीन खेळ घेतांना त्याच्यातल्या 'अर्जूनाला' ओळखून घेत होतो.झुंबा मध्ये येणारे शारीरिक व्यायाम,त्यात आपल्या भाषेतील गाणं असलं की पोरं देतात प्रतिसाद मनापासून अगदी..."दिल से" अन् यातून गवसला "आपल्यातला अर्जून".
अर्जूनशी संवाद वाढल्याने पोरंग आपले कलागुण दाखवू लागला.त्यात सर्वांनी केलेलं कौतुक तर नवी ऊर्जा भरतं अंगात.अर्जूनला येत असलेल्या बाबी टप्प्याटप्प्याने आम्ही जाणून घेत गेलो.त्याची शारीरिक लवचिकता तर भन्नाटच.हातात आलेली रिंग तर सहजच हातापायांशी खेळत तो फिरवतो.विविध प्रकारच्या उड्या,खेकडा चाल,साहित्यासह शारीरिक कृती करून दाखवत आपले लक्ष वेधून घेतो.
अर्जून शांत,संयमी लेकरू.त्याला विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ मिळालं.झालेलं कौतुक यामुळे तो बिनधास्त व्यक्त होतोय.आपल्यातलं कौशल्य सादर करतोय.सादला प्रतिसाद देतोय अगदी बिनधास्त.हे होतंय फक्त एकमेकांवरील विश्वासू संवादामुळे.विशेष म्हणजे अशी लेकरं भेटत आहेत सातत्याने होत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळेच..!
शारीरिक शिक्षणाचं महत्त्व हे शालेय शिक्षणात महत्त्वाचे आहे.अर्जून नावाप्रमाणेच 'अर्जून' आहे.विविध कलागुणांनी भरलेला हा सखा प्रत्येक भेटीत नव्या रुपात भेटतो.'आपल्यातला अर्जून' जागा करतो.आपल्यातल्या बालमनाला बालपणाच्या हिंदोळ्यावर खेळ खेळायला लावतो.सुख दुःखाचे क्षण वेचायला भाग पाडतो.मुलं मुलांपासून शिकतात हे जेवढं खरं तेवढंच आपणही त्यांच्यापासून बरंच शिकत असतो हे ही सत्यच आहे.
'आपल्यातला अर्जून' हा नेहमीच आपल्यात डोकावत असतो.कधीकधी होऊन जाऊयात 'अर्जून'. अर्जूनाशी संवाद साधल्याने त्याच्यातलं नाविन्यपूर्ण कौशल्य बघायला नि अनुभवायला येतंय.इतर मुलं शिकत आहेत अन् आम्हीही...!
चला तर मग शोधूयात 'आपल्यातल्या अर्जूनाला'...!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
9665911657

No comments:
Post a Comment